अकोला - आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना झालेली विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज पालखी आज अकोल्यात दाखल झाली. पारस, गायगाव व भौरदमार्गे ती शहरात उद्या प्रवेश करणार आहे. महाराजांच्या पालखी दर्शनाचा सोहळाच अकोलेकर साजरा करतात. दोन दिवस मुक्कामी राहणाऱ्या या पालखीचे दर्शन अकोलेकर घेणार आहेत.
विदर्भाची विठु-माऊली असलेल्या श्री संत शेगाव येथील गजानन महाराजांच्या भक्तांचा समुदाय मोठा आहे. हजारो भक्त दररोज शेगावच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. दर गुरुवारी येथे दर्शनासाठी भक्तांचा मेळावा असतो. दरवर्षी महाराजांची पालखी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पायी जाते. या पायदळ वारीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. ही पालखी नागझरीमार्गे रात्री अकोला जिल्ह्यात दाखल झाली. पारस येथे रात्रीचा मुक्काम करून ती आज पहाटे पुढील प्रवासाला निघाली. निमकरदामार्गे ही पालखी गायगाव, भौरद येथे मुक्काम करेल. त्यानंतर उद्या सोमवारी सकाळी ती शहराच्या वेशीवर येईल. शहरात दाखल झालेल्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येईल. पाणी, चहा, थंड पेय, औषधांसह आदी साहित्य या वारकऱ्यांना वाटले जाते. दोन दिवस पालखी अकोल्यात मुक्कामी असते. त्यामुळे अकोल्यात भक्तिमय वातावरण राहते.