अकोला - कौलखेड चौक येथील गजानन इस्टेट कॉम्प्लेक्समधील पियुष कलेक्शन या कापड दुकानात आज (बुधवार) दुपारी अचानक एक कोल्ह्याचे पिल्लू शिरले. दुकानात शिरलेल्या कोल्ह्याने दुकानातील संचालक व दुकानांमध्ये काम करणारी युवतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बचावामध्ये संचालक राजेश तायडे व दुकानातील युवती यांनी पळ काढताना त्याच्या अंगावर खुर्ची व टेबल फेकले. कोल्हा दुकानातील एका कपड्याच्या रॅक खाली लपून बसला. दुकानातील संचालक आणि युवतीने दुकानाच्या बाहेर पडत दुकानाचे शटर लावून घेऊन कोल्ह्याला आतच बंद केले. अकोला वन विभागाच्या पथकाने कोल्ह्याला पकडले.
दुकानात कोल्ह्याचे पिल्लू शिरल्याची माहिती संचालक तायडे यांनी वनविभागाचे वनरक्षक राजेश बिरकड यांना दिली. राजेश बिरकड यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. तर कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळ गाठले. वनविभागाच्या पथकाने जाळ्याच्या सहाय्याने या कोल्ह्याला पकडून पिंजऱ्यात जेरबंद केले. पकडलेल्या कोल्ह्याला त्वरित पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमधील पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलामध्ये सुखरूप सोडण्यात आले. ही कारवाई अकोला वन विभागाचे आर.एफ.ओ. ओवे, वनपाल गीते , मानत वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक राजेश बिरकड, सुभाष काटे यांनी केली.