अकोला - शेगाव येथून देवदर्शन आटोपून परत येत असलेल्या भाविकांच्या कारला एका आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चार युवक ठार झाले आहेत. अपघाताची ही घटना अकोला शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पहाटेच्या सुमारास घडली आहे. अपघातात तिघांचा जागीच तर, एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. हे चौघेही मालेगाव तालुक्यातील पांगरिकुटे येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये शुभम कुटे, धनंजय नवघरे, विशाल नवघरे, मंगेश राऊत यांचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे गावातील रहिवासी चार युवक शेगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. नऊ जुलैच्या रात्री दर्शन आटोपल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरून घरी परत जात असताना त्यांची कार (एमएच 37 जी 8262) आणि खामगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच 19 सीवाय 6404) मध्ये जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेमध्ये 3 युवकांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच बाळापूर पोलीस राष्ट्रीय महामार्गावरील घटनास्थळावर दाखल झाले.
पांगरी गावावर शोककळा-
घटनास्थळावर कारमधील एक युवक गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले, मात्र रस्त्यातच त्याचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये पांगरी कुटे येथील गावावर शोककळा पसरली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त कारला रस्त्याच्या बाजूला केले. या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.