अकोला - लग्न लावून देतो, असे सांगून बनावट नातेवाईकांच्या समोर मुलीचे मुलासोबत लग्न लावून देऊन मुलाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या चौघांना डाबकी रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांना न्यायालयाने 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकाराचा भांडाफोड केल्याने या चौघांनी फसविलेली आणखी प्रकरणे समोर येणार आहेत.
हेही वाचा - 'आदिवासींच्या संदर्भातील जीआर रद्दसाठी आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा'
तक्रारदार राहुल विजय पाटील यांना लग्नासाठी सुदाम करवते याने पातूर बसस्थानकावर बोलवले. नंतर राहुल यांना व इतर नातेवाईकांना अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिर, डाबकी रोड येथे मनीषा पाटील या नावाची मुलगी दाखवण्यात आली. ही मुलगी राहुलला पसंत आली. त्यानंतर लग्न लावून देण्यासाठी सुदाम करवते याने त्यांना एक लाख 60 हजार रुपयाची मागणी केली. तसेच, पातूर येथील मुलीकरिता एक लाख 30 हजार रुपयांची मागणी केली. नंतर राहुल यांचे मनीषाशी लग्न झाले. त्यानंतर राहुल व त्यांचे नातेवाईक मनीषा बरोबर आपल्या वाहनाने निघून गेले. नंतर प्रभात किड्स शाळेजवळ आरोपींच्या साथीदाराने राहुल यांच्या गाडीला कट मारला व त्या कारणातून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी संधीचा फायदा घेत मनीषा ही गाडीमधून बाहेर आली आणि वाद घालणाऱ्या साथीदारासोबत दुचाकीवर पळून गेली.
एक लाख 30 हजार रुपयांनी फसवणूक
या प्रकरणात सुदाम करवते व त्यांच्या साथीदाराने फिर्यादी राहुल यांची एक लाख 30 हजार रुपयांनी फसवणूक केली. नंतर राहुल यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर सुदाम करवते हा अकोला पंचायत समिती जवळ असल्याच्या माहितीवरून त्यास व त्याच्यासोबत चार ते पाच जणांना डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये सुदामचे खरे नाव गुलाब नारायण ठाकरे असल्याचे त्याने सांगितले.
20 हजारात दुसरे बनावट आधारकार्ड बनविले
तसेच, या अगोदर फसवणूक झालेल्या अतुल सोनवणे पाटील यांच्याकडून घेतलेल्या दीड लाखातील 20 हजारात त्यांनी बनावट दुसरे आधारकार्ड बनविले. डाबकी रोड पोलिसांनी यामध्ये शंकर बाळू सोळंके, संतोष उर्फ गोंडू सीताराम गुडधे, हरिसिंग ओंकार सोळंके यांना अटक केली आहे. यातील चारही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चौघांना 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा - सायकल रॅलीच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली; शिवसेनेचा उपक्रम