अकोला - जिल्ह्यामध्ये अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याबाबत तक्रार करुनही अवैध सावकारांना पाठीशी घालण्याचा प्रकार जिल्हा निबंधक कार्यालय करत असल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी रविवारी (दि.3 जाने.) पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे डीडीआर कार्यालयामध्ये याविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
अवैध सावकारीचा व्यवहार कोट्यवधीमध्ये पोहोचला आहे. या सावकारीच्या विरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, त्या तक्रारींवर कुठलीच कारवाई होत नाही. या अवैध सावकारांच्या कचाट्यात हजारो गरीब फसत आहेत. मात्र, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडे तक्रार करुनही ते या प्रकरणांमध्ये खाबुगिरी करत गरिबांना तारखेवर तारीख देत आहेत. परिणामी,अवैध सावकार यांचे आणि डीडीआर कार्यालयातील अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने सावकारी कायदा हा कुचकामी ठरत आहे. राज्यामध्ये अवैध सावकारीच्या प्रकरणात निकाल लागल्याचे टक्केवारीही एक टक्का असल्याची माहिती माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी दिली. अवैध सावकार हे अवाच्या सवा नागरिकांकडून व्याज वसूल करीत आहेत. ही पिळवणूक थांबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय कुठलीच योग्य ती कारवाई करत नसल्याच्या कारणावरून डीडीआर कार्यालयातच आता आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
हेही वाचा - आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातील शेतकरी दिल्लीकडे रवाना
हेही वाचा - राष्ट्रवादी शहराध्यक्षांच्या नियुक्तीने पदाधिकाऱ्यांमध्ये भरला उत्साह