अकोला - शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या शेतमजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पातूर तालुक्यातील कार्ला येथे घडली आहे. सर्व मजुरांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम सुरू आहे. यासाठी खामगाव तालुक्यातील अटाळी व पातूर तालुक्यातील तुलंगा येथील २६ मजूर काम करण्यासाठी कार्ला या गावामध्ये आले होते. यातील काही मजुरांना मळमळ, उलट्या, पोट दुखणे आणि संडासला लागणे, असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी सकाळीच जवळच असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे धाव घेऊन उपचार घेतले. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत.
उपचार सुरू असलेल्या मजुरांची नावे -
अविनाश भोसले, सुनील चव्हाण, अरुण पवार, शालू भोसले, दिव्या चव्हाण, पल्लवी चव्हाण, दिलीप पवार, वैजांती भोसले, प्रवीण काळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचबरोबर खडकाळ सिंग पवार, जनाबाई पवार, देव चव्हाण, साहिल भोसले, महेश भोसले आणि वैशाली भोसले यांच्यावरही उपचार सुरू आहेत. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फैजान असलम यांनी सांगितले.