अकोला - निगुर्णा तलावामध्ये बेकायदेशीरपणे मासेमारी करत असलेल्या संस्थेचा ठेका रद्द करा, या मागणीसाठी आलेगाव येथील भोई समाजातील मासेमार व निगुर्णा मासेमारी सहकारी संस्थेने आज तलावात निषेध आंदोलन केले. राष्ट्रीय मछुआ समुदाय संलग्न, राष्ट्रीय भोई समाज क्रांतीदल महाराष्ट्र प्रदेशचे विदर्भ अध्यक्ष गणेश सुरजूशे यांच्या नेतृत्वाखाली निगुर्णा तलाव येथे मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.
पातूर तालुक्यातील निगुर्णा तलाव स्थानिक मत्स्यमार करणाऱ्या जनतेचे उपजीविकेचे साधन आहे. त्यातच पातूर तालुक्यातील चोंडी येथील जय बजरंग मासेमारी सहकारी संस्थेला देण्यात आलेल्या ठेक्यात नमूद करण्यात आले होते की, मासेमारीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. या संस्थेने या नियमाचे पालन न करता गैरकायदेशीर पद्धतीने ४ जूनपासून १०० ते १५० मच्छीमार बाहेरून आणून आणि स्थानिकांना डावलून बेकायदेशीरपणे मासेमारी करीत आहे. यामुळे भोई समाजातील मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. याबाबत शासन स्तरावर वारंवार तक्रारी करूनसुद्धा आतापर्यंत जय बजरंग मत्स्यमारी सहकारी संस्थेवर कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्यांना स्थानिकांना प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे या संस्थेच्या विरोधात आणि शासनाला याबाबत माहिती मिळावी, यासाठी आलेगाव येथील भोई समाजातील मासेमार व निगुर्णा मासेमारी सहकारी संस्थेने निषेध आंदोलन केले आहे. याबाबतचे निवेदन अकोला जिल्हा पालकमंत्री ओमप्रकाश कडू यांच्यासह मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रादेशीक उपआयुक्त मच्छीव्यवसाय अमरावती, विभाग अमरावती, जिल्हा पोलीस अधिक्षक, कार्यालय अकोला यांना देण्यात आले आहे.