अकोला - शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने भारत बंदला पाठींबा देत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. दरम्यान सोमवारी (२७ सप्टेंबर) अकोला येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली विना परवानगी काढण्यात आल्याने नाना पटोले यांच्या सह 120 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शहर कोतवाली पोलिसांनी दिली आहे.
परवानगी न घेता रॅली काढणे व कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप पटोले व कार्यकर्त्यांवर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. स्वराज्य भवन येथून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शहरातील विविध प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत निघाली होती. या रॅली दरम्यान विविध नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यात कोविड नियमांचा फज्जा उडविला गेला. या रॅलीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १०० ते १२० जणांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कलम विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - प्रचारादरम्यान शिवसेनाप्रणित आमदाराची जीभ घसरली; काँग्रेस, राष्ट्रवादीवर खालच्या भाषेत टीका