अकोला - मूर्तिजापूर येथील मृत्यू झालेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल हाती येण्याआधीच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. नातेवाईकांनी मृतदेहावर धर्मानुसार सोपस्कार करून अंत्यविधी पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे.
त्या व्यक्तीच्या घशाचे नमुने आरोग्य प्रशासनाने घेतले. त्यानंतर अहवाल यायला वेळ लागत असल्याने त्या आधीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी या मृतदेहावर आवश्यक ते सोपस्कार करून त्यांचा अंत्यविधी पार पाडला. विशेष म्हणजे, अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून वीस नागरिकांची परवानगी असतानाही या कार्यक्रमाला शेकडो नागरिक त्यांच्या घराबाहेर उभे होते. त्यामध्ये येथील लोकप्रतिनिधी यांच्यासह इतरही मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
दरम्यान, मृतदेहाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाचे डोळे उघडले. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांच्या नावांची यादी तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्य तपासणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. उपस्थित असलेल्यांचा आकडा पाचशेच्या जवळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या तपासण्यांमधून किती अहवाल येतील याकडे जाता सर्वांचे लक्ष लागले आहे.