अकोला - परतीच्या पावसात शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई मिळावी, केंद्र सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, यासह प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निवासस्थानासमोर आज आंदोलन केले. या आंदोलनामध्ये केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी नारेबाजी केली. यावेळी सिव्हिल लाइन पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ते पीक खराब झाले आहे. ज्वारी पण परतीच्या पावसामुळे काळी झाली आहे. सोयाबीन पूर्णपणे खराब झाले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार हे डोळे मिटून बसलेले आहेत. या वर्षीची दिवाळी शेतकऱ्यांसाठी खराब ठरत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई केंद्र सरकारनेही द्यावी, शासनाने कापूस खरेदी सुरू करावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच पीक विम्याच्या ज्या जाचक अटी आहेत, त्या रद्द कराव्यात, यासह अनेक मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.
दरम्यान, या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. केंद्रीय राज्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर शेतकरी स्वाभिमानी संघटनेतर्फे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या अनुपस्थित त्यांच्या प्रतिनिधीकडे निवेदन देण्यात आले. यानंतर पोलिसांनी आंदोलनक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - दिवाळीपूर्वी सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी, सोयाबीनची आवक वाढली
हेही वाचा - अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन