अकोला - सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान सिटी कोतवाली, बाळापूर, पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या तिन्ही पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 45 जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
हेही वाचा - 'बंददरम्यान झालेल्या घटनांवेळी पोलिसांची भूमिका बघ्याची'
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली. बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंदच्या आंदोलनात काही असामाजिक तत्त्वे सहभागी झाल्यामुळे या भारत बंदला हिंसक वळण मिळाले. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी असलेल्या आयोजकांसह पोलिसांनी चौकशीत आलेल्या नावांच्या व्यक्तींनाही अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये पातुर, बाळापूर आणि अकोला शहरातील 45 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा - पेट्रोल पंपासमोरच 'बर्निंग कार'चा थरार
दरम्यान, यातील उपोषणकर्त्या आंदोलकांची संख्या वाढण्याची शक्यता असून अटक केलेल्या आंदोलकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या पुढे एनआरसी आणि सीएए विरोधातील मोर्चे किंवा आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी दिली.