अकोला - कोरोनमुळे संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. संचारबंदी उल्लंघन करणाऱ्यांवर हिवरखेड ग्रामपंचायत तथा हिवरखेड पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याची शक्कल लढवली आहे. त्यामुळे गावात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग आहे, हे विशेष.

कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावरचं प्रतिबंध म्हणून देशभरामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे. तरीही ही जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावर नागरिक घराबाहेर पडत आहेत. हा प्रकार शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना सूचना देऊनही ते ऐकण्यास तयार नसल्याने आता हिवरखेड पोलिसांनी यावर एक नामी शक्कल काढली आहे. हिवरखेड ग्रामपंचायत सरपंच अरुणा ओंकारे, हिवरखेड पोलिस निरीक्षक आशिष लवांगडे यांनी एकत्र मिळून ड्रोन कॅमेराची व्यवस्था केली आहे. या गावात बाहेर फिरणाऱ्यावर आता थेट कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून त्यामध्ये दिसणाऱ्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, हिवरखेड ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या संयुक्त उपक्रमामुळे ग्रामस्थही सावध झाले आहेत. या उपक्रमामुळे ग्रामस्थ आता घराबाहेर पडणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
