अकोला - जिल्ह्यातील 532 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी 271 ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचपदांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ईश्वर चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली.
उत्कंठा शिगेला
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित होती यासंदर्भात ग्रामस्थांसह इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील एकूण 532 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी 2020 ते 2025 या कालावधीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत दि. 8 डिसेंबर जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात काढण्यात आली. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये जिल्ह्यातील 532 सरपंच पदांपैकी 271 महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत आज करण्यात आली.n त्यामध्ये जिल्ह्यातील 271 ग्रामपंचायतींच्या महिला सरंपचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून सोडत जाहीर
जिल्ह्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी राखीव होते या संदर्भातील सोडत ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शाखेचे प्रभारी अधिकारी प्रा. संजय खडसे यांचा सह जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तहसीलदार प्रामुख्याने उपस्थित होते.