अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दर रविवारी 24 तास संचारबंदीचे आदेश दिले आहेत. संचारबंदीमुळे आज शहरातील सर्व व्यापार, बाजारपेठा बंद आहेत. प्रत्येक चौकांमध्ये पोलिसांचा तगडा पहारा आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज दीडशेहून अधिक वाढत आहे. त्यावर अंकुश बसवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अचानक आठ ते दहा दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासन हतबल झाल्याची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या संचारबंदीच्या आदेशाचा आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या रविवारी शहरातील संपूर्ण बाजारपेठा व्यापार बंद होते. त्यासोबतच महत्त्वाच्या कामांसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. बाहेर निघालेल्या नागरिकांची चौकाचौकात उभे असलेल्या पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती.
विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
दरम्यान, शहर वाहतूक शाखेकडून विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असून त्यांची वाहने जप्त करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी दंड लावला नसल्याचे चित्र आहे. परंतु, अनेक नागरिक त्याच भीतीने घराबाहेर पडत नसल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे.