अकोला - 23 फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारांमध्ये आज खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. बाजारामध्ये नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज दीडशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली होती. या संचारबंदीनंतर आता प्रशासनाने 23 फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत संचारबंदीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाजारामध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार
दरम्यान 23 फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, ज्यामध्ये मेडिकल, भाजीपाला, किराणा, दूध यांची दुकाने तसेच पेट्रोल पंप सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सकाळी आठ ते दुपारी तीन आणि प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रांमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.