अकोला - फळविक्री आणि भाजीबाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने आता नवीन निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टन्ससिंगचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून भाजीबाजार आणि फळविक्रेत्यांनी हातगाडीवरच विक्री करावी, असे आदेश महापालिका प्रशासन देणार आहे. जमिनीवर बसून भाजीपाला विक्री करताना सामाजिक अंतर ठेवणे शक्य होत नसल्याने महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. विक्रेत्यांना ठराविक परिसर निश्चित करून तिथेच विक्री करावी लागणार असल्याचेही नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा... नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाजीपाला, धान्य खरेदी करा; सरकारची उद्योग समुहांना विनंती
फळविक्री आणि भाजी बाजारामध्ये सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने एक प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजीबाजारात खाली बसणाऱ्या विक्रेत्यांना आता हातगाडीचा उपयोग करावा लागणार आहे. जे विक्रेते हातगाडीचा वापर करणार नाहीत त्यांना भाजीबाजारांमध्ये विक्री करता येणार नसल्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतलेला आहे.
हातगाडीवर भाजीपाला, फळेविक्री करणाऱ्यांना परिसर आणि गल्ली नेमून देण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी विक्रेत्यांनी फळ व भाजीपाला विक्री करावी. इतरत्र त्यांनी विक्री करू नये, अशा प्रकारचे नियोजनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या दोन्ही नियोजनावर मनपा प्रशासन कशा प्रकारे यशस्वी होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या नियोजनामुळे खरच सोशल डिस्टन्ससिंगचे पालन होईल का ? असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.