अकोला - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढ आणि मृत्यू दर राज्याच्या दुप्पट आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर अकोल्यात तेरा दिवसांवर आला आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर तीन टक्के आहे, तर अकोल्यात साडेपाच टक्के आहे. राज्यात 17 दिवसांत कोरोनारुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. अकोल्यात मात्र 13 दिवसांत रूग्ण दुप्पट होत असल्याचे समोर आले आहे. अकोल्यात आत्तापर्यंत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांशी रूग्ण हे कोरोनाच्या शेवटच्या टप्प्यात दाखल झालेले होते, असे टोपे यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिकेने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच रुग्णांची तपासणी करताना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. संदिग्ध रुग्णांना तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे. ठिकठिकाणी फिवर क्लिनिक स्थापन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचनाही टोपे यांनी मनपा आयुक्तांना दिल्या.