अकोला- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दोन वर पोहोचली आहे. अकोट फाइल या परिसरातील एक रुग्ण कोरोना ग्रस्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. प्रशासनाकडून हा परिसर सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अकोल्यामध्ये मंगळवार पर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. परंतु, मंगळवारी सायंकाळी प्रशासनाकडून एक रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली होती. या रुग्णावर उपचार सुरू होत नाही तोच आज दुसरा रुग्ण अकोल्यात आढळला आहे.कोरोनाबाधित दुसरा रुग्ण अकोट फाइल पोलीस ठाणे हद्दीतील असून हा परिसर सील करण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अकोल्यामध्ये रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. त्यामुळे भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बैदपुरा या परिसरातील पहिला रुग्ण हा दिल्ली येथे जाऊन आला किंवा नाही, याबाबत मात्र प्रशासनाकडून कुठलीही माहिती पुरवण्यात आली नसली. तरी पोलीस प्रशासनाकडून मात्र त्याचा तपास करण्यात येत आहे.