अकोला- उत्तर प्रदेश येथे राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या अटकेच्या विरोधात अकोला काँग्रेसतर्फे आज निषेध व्यक्त झाला. पक्षातर्फे वाशिम बायपासवर आज दुपारच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी योगी सरकार विरोधात नारेबाजी केली. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.
उत्तर प्रदेशमधील युवतीवर अत्याचार केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आज राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना मज्जाव करीत धक्काबुक्की केली. या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसने वाशिम बायपास येथे आज रास्तारोको केला. जुने शहर पोलिसांनी आंदोलकांना लगेच ताब्यात घेऊन हा रास्तारोको हाणून पाडला.
जुने शहर पोलिसांनी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांना जबरदस्तीने उचलून हा रास्तारोको उधळून लावला. त्यानंतर अटक केलेल्या आंदोलकांना जुने शहर पोलीस ठाण्यात आणले.
हेही वाचा- अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन