अकोला - 'बर्ड फ्लू'चा धोका राज्यात कायम असताना त्याची झळ अद्याप अकोल्यात पोहोचलेली नाही. तरीपण शहरातील चिकन व्यवसायिकांकडे ग्राहक फिरकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, अंड्यांचेही भाव उतरले असले तरी त्यालाही ग्राहक सापडत नाहीत, अशी अवस्था आहे.
देशात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा उद्रेक होत आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना चिकन खाणाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेकजण आता बोकडाचे मांस आणि मासे खात आहे. अकोल्यातील रविवारी हा मांसाहारासाठीचा खास दिवस असतो.
ग्राहक नाही फिरकले
शहरातील चिकन व्यवयसायिकांकडे चिकन खरेदीसाठी चांगलीच झुंबड उडते. परंतु, आता या दुकानांवर ग्राहक फिरकले नाहीत. काही ठिकाणी बोटावर मोजण्याइतके ग्राहक फिरकले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
चिकनचे दर घसरले तरीही ग्राहक घेण्यास तयार नाहीत..
अकोला शहरातील भांडपुरा चौक, मोहम्मद अली रोड , उमरी रोड , खदान परिसरात मोठ्या प्रमाणात चिकन व मटण विक्रीचा व्यवसाय होतो. मात्र मागील 6 दिवसांपासून ग्राहकांनी चिकन व मटण घेण्यास नापसंती दाखविली आहे. चिकनचे दीडशे रुपयांवरून 120 रुपये प्रतिकिलो झाले तरी ग्राहक चिकन घेत नाही आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
नागरिकांना घाबरून न जाता फक्त काळजी पूर्वक चिकन खाण्याचा सल्ला दिला आहे. अद्याप अकोला जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एकही प्रकार उघडकीस आला नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले आहे.
कोंबड्यांची नमुना अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यातील आतापर्यंत 600 ते 700 कोंबड्याचे नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर चाचोंडी या गावातील दोन नमुने संशयास्पद असले तरी त्यांचा अहवाल अजूनपर्यंत आला नाही. तरीपण खबरदारी म्हणून अहवाल येईपर्यंत हे गाव संवेदनशील असल्याचे घोषित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.