अकोला - विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पातील व्यवहारासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून घोटाळा उघडकीस झाल्यानंतर त्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. घोटाळ्यात जिल्ह्यातील उमा, पूर्णा आणि दगडपारवा सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. चौकशीदरम्यान सिंचन प्रकल्पांमध्ये चुकीच्या पद्धतीने कंत्राट मिळवणे व लोकसेवकांच्या मदतीने घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरी या संबंधित कंत्राटदार कंपनी, संचालक, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, हे गुन्हे दाखल होऊन खरंच पुढील कारवाई होईल किंवा हे प्रकरण कागदावरच चौकशीमध्ये ठेवण्यात येईल का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
विदर्भातील सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणारे उमा, पूर्णा, दगडपारवा सिंचन प्रकल्पातील व्यवहाराबाबत एसीबीला चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी उमा प्रकल्पातील वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार, टीबीपीआर इन्फ्रा. प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार, तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. टी. देशमुख, पॉवर ऑफ अॅटरणी अमर शिंदे व दीपक देशकर, तत्कालीन लेखापाल अरुण कोकडे, कार्यकारी अभियंता विजय लोळे, निविदा लिपिक नरेंद्र मिश्रा, पूर्ण प्रकल्पातील एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शनचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार, ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार, तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. टी. देशमुख, तत्कालीन लेखाधिकारी संजीव कुमार, दगडपारवा प्रकल्पातील आर. जे. शहा अँड कंपनी मुंबईचे सर्व संचालक आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपाधीक्षक आर. एन. मालघाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड हे काम पाहत आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असले तरी याबाबत मात्र अकोला एसीबीमधील एकही अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे हे प्रकरण चौकशीत राहील, यावर पुढील कारवाई होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - मेळघाटातील शहानूर-बोरी जंगल सफारीत पट्टेदार वाघाचे दर्शन