अकोला - तेल्हारा शहरातील श्री संत तुकाराम महाराज चौकात असलेल्या एका गादी भंडाराला मंगळवारी (8 जून) रात्री आग लागली. या आगीमध्ये गादी भंडाराचे भरपूर नुकसान झाले आहे. या आगीमुळे बाजूला असलेल्या दोन दुकानांनाही क्षती पोहोचली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी तेल्हारा आणि अकोट येथील अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले.
आगीत दुकान जळून खाक
तेल्हारा शहरात असलेल्या श्री संत तुकाराम महाराज चौकात गादी भंडार आहे. बऱ्याच वर्षांपासून हे दुकान या ठिकाणी कार्यरत आहे. मंगळवारी रात्री या दुकानाला आग लागली. पाहतापाहता या आगीमध्ये दुकानातील संपूर्ण कापूस, गादी बनविण्यासाठी असलेले साहित्य व मशीन जळून खाक झाले. या आगीमुळे बाजूला असलेल्या दोन दुकानांनाही क्षती पोहोचली आहे. त्यांचेही नुकसान झाले आहे.
कोणतीही जीवितहानी नाही
आग आटोक्यात आणण्यासाठी तेल्हारा आणि अकोट येथील अग्निशामक दलाने प्रयत्न केले. शेवटी तीन ते चार तासानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या दुकानांमधून धूर निघत होता. घटनास्थळी तेल्हारा शहर पोलीस दाखल झाले. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी तेल्हारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी