अकोला - नागरिकांना रक्ताची कमतरता भासू नये आणि राज्यामध्ये रुग्णांना अतिरिक्त रक्ताची गरज भासत असल्याने 135 कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार) रक्तदान केले आहे. या रक्तदात्यांचे कौतुक करीत कोरोना विषाणूबाबत जनतेने घाबरून जाऊ नये, जागरूक रहावे असे आवाहन शिक्षण सभापती पांडे गुरुजी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अकोला येथे जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी संघटनांतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सध्या सर्वत्र संसर्गजन्य कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात रक्ताची गरज भासू शकते म्हणून शिबीर आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, सभापती आकाश शिरसाट, सभापती मनीषा बोर्डे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, प्रदीप वानखेडे, धैर्यवर्धन पुंडकर आदी उपस्थित होते.
सर्व रक्तदात्यांनी संपूर्णतः सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केले. तसेच प्रमुख अतिथीद्वारे रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायझर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व रक्तदात्यांना टप्प्याटप्प्याने शिबिरस्थळी बोलावण्यात आले होते. मास्क घालून येणे अनिवार्य करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे आयोजन सुनील जानोरकर, प्रकाश चतरकर, शशिकांत गायकवाड यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सहकार्य केले.