अकोला - भारतीय जनता पक्षाने लॉकडाऊन आणि इतर कारणांनी देशाची अर्थव्यवस्था बिघडवली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच आज देशातील 10 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यावर अधिक चर्चा होत आहे. मात्र, देशातील 15 कोटी लोकांचा रोजगार गेला त्यावर कुणी काहीच बोलायला तयार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे दूर्लक्ष करण्यासाठी कोरोनाला समोर करण्यात येत आहे. राज्यात आणि केंद्रात सुलतानशाही असल्याची टीका अॅड. आंबेडकर यांनी केली.
यावेळी ते म्हणाले, अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील शेतकर्यांनी खरीप पीक कर्जाचा लाभ घ्यावा. शेतकर्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज घेण्याची गरज आहे. यासाठी 69 हजार शेतकर्यांना 551 कोटी कर्ज वाटप करायचे आहे. शेतकर्यांनी सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडे अर्ज करावा. त्यांनी कर्ज प्रक्रिया पुर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि भारिपचे तालुका पदाधिकारी शेतकर्यांना मदत करतील, अशी आश्वासनही त्यांनी दिले. तर राज्यातील काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही सत्तेसाठी हपापलेले असल्याची टिका त्यांनी येथे केली.
तसेच देशात उत्पादन सुरु करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊन काळात देशात खरेदी करणारा खरेदीदार कुठे आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. विकत घेणार्या वर्गाच्या हातात पैसा आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी परदेशी पाहुण्यांवर बंदी घातली असती तर देशात कोरोना आलाच नसता, असा दावा त्यांनी यावेळी केला. तर देशातील कोरोनाची स्थिती ही कुटुंबात आहे. ती सामुहिक झाली नसल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले.