अकोला - लोकसभा निवडणुकीत राज्यात अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.
राज्यातील लोकसभा निवडणुकीत मतदान हे ईव्हीएमद्वारे घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी मतदारांच्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त मतदान झालेले दिसून आले. जास्तीचे झालेले मतदान याचा हिशोब निवडणूक आयोगाने द्यावा. तसेच मतदानातील आढळलेल्या या त्रुटी राज्यातील लोकसभा निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात. यासोबत भविष्यात होणाऱ्या विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन केले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, शोभा शेळके, वंदना वासनिक, शंकरराव इंगळे, सीमांत तायडे, पुष्पा इंगळे, रंजीत वाघ, बुद्धरत्न इंगोले, महादेव शिरसाट यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.