अकोला - शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये जंक फूड किंवा तळलेले पदार्थ ठेवण्यास अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून मज्जाव करण्यात येत आहे. ज्या कॅन्टीनमध्ये असे पदार्थ आढळतील त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव या विभागाकडून ठेवण्यात येऊ शकतो. याबाबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या कॅन्टीन चालकांना प्रशासनाकडून सूचना वजा पत्रही देण्यात आले आहे.
महाविद्यालय, शाळा, विद्यापीठ येथे मिळणाऱ्या जंक फूडपासून विद्यार्थी दूर राहावेत, असा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तेलकट पदार्थ किंवा बेसन, मैदा यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच अनियमित जेवण आणि सहज कोणत्याही हॉटेल किंवा कॅन्टीनमध्ये उपलब्ध होणारे जंकफुड यापासूनही आरोग्याला बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.
राज्य शासनाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागाला कडक सूचना दिल्या गेल्या आहेत. या सूचनांचे पालन करीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.जी.राठोड यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांना पत्र देऊन आपापल्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याला इजा पोहोचेल, असे पदार्थ ठेवण्यात येऊ नये असे नमूद केले आहे. तसेच याबाबत तक्रार झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचाही विचार प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.