अकोला - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी (MLC Election Result) आज मंगळवारी सकाळी होणार आहे. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचे आव्हान आहे. (BJP Candidate Vasant Khandelwal) तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचे आव्हान आहे. काँग्रेसने ऐनवेळी छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. आता या राजकीय कुरघोडीमध्ये कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे आज स्पष्ट होणार आहे.
आजचा दिवस निर्णयाक -
अकोला विधानपरिषद निवडणुकीत सेनेकडून गोपिकीशन बाजोरिया यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल हे उभे आहेत. दहा डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर विजयाचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. (MVA candidate Gopikishan Bajoriya) तर या दोन्ही पक्षातील अंतर्गत वादामुळे नेमका कोणता उमेदवार विजयी होईल, ही चर्चा संभ्रमात टाकणारी आहे. परिणामी, निकाल हाथी येण्याआधी मात्र विजयाचे पक्के दावे होत असले तरी या निवडणुकीत चौथ्यांदा विजयी बाजोरिया होतील की पहिल्यांदा खंडेलवाल येतील, यावर उद्याचा दिवस निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत 822 पैकी 808 मतदान झाले आहे. 14 मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे हे 14 मतदार कोणाच्या पथ्यावर पडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीची तयारी पूर्ण -
मतमोजणी आज 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. त्यामध्ये 25 मतपत्रिकेचे गठ्ठे करून ते 5 टेबलावर देण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरवात होणार आहे. या मतमोजणीमध्ये कुठलेही राउंड होणार नाही. थेट मतमोजणी सुरू झाल्यानंतर निकाल जाहीर होणार आहे. जवळपास दीड तासांच्या आत निकाल बाहेर येतील, अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून तशी तालिम ही घेण्यात आली आहे.