अकोला - जागेच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (6 डिसेंबर) सकाळी उघडकीस आली आहे. हा प्रकार गोरक्षण रस्त्यावरील हरीश स्वीट मार्ट येथे गुरुवारी सायंकाळी घडला. इंद्रजित केशरवानी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. इंद्रजित यांना त्यांच्या भावांनीच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
हरी स्वीट मार्ट या दुकानाला लागूनच इंद्रजित केशरवानी यांची पान टपरी आहे. तर, स्वीट मार्ट त्यांचे भाऊ हरिप्रसाद केशरवानी, दीपक लखन केशरवानी हे दोघे पाहतात. गेल्या अनेक दिवसांपासून या तिन्ही भावंडांमध्ये दुकानासमोरील जागेवरून वाद सुरू होता. गुरुवारी या तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यातच इंद्रजित यांना दोन्ही भावांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - संतापजनक.. नवविवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; पती,सासूला अटक
इंद्रजित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इंद्रजित यांच्या भावंडांवर खदान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. खदान पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा करून कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.