अकोला - पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. या पाच जणांमध्ये अकोल्यातील चांदूर येथील महेंद्र प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे. महेंद्र इंगळे यांचा मृतदेह त्याच्या चांदूर गावी आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. महेंद्रचा मृत्यू ग्रामस्थांना व मित्रांना हेलावून टाकणारा ठरला आहे. महेंद्र हा सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीच्या मेंटन्ससाठी गेला होता.
दीड वर्षाआधी झाला होता विवाह -
महेंद्रचे प्राथमिक शिक्षण अकोला आणि नंतर वाशिम व नागपूर येथे झाले होते. तसेच त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. गेल्या चार वर्षांपासून तो पुणे येथील एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. इलेक्ट्रॉनिक्स मेंटन्ससाठी तो सीरम इन्स्टिट्यूट येथे गेला होता. तसेच दीड वर्षाआधी त्याचा विवाह झाला होता. पत्नी, आई, वडील असा त्याचा आप्तपरिवार आहे. गावात तो सर्वांशी मनमिळाऊ राहत होता. सर्वांना मदत करणारा आणि नेहमीच हसमुख, असा त्याचा स्वभाव होता. आज शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'इतरांना देशभक्तीचे दाखले देणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं'