अकोला - 'आओ कोरोना योद्धाओं का सन्मान करे' या घोषवाक्याला सामर्थ्य देणारी चित्रकला स्पर्धा अकोल्यात घेण्यात आली. पोलीस विभागाच्या पुढाकाराने आणि रोटरी क्लब, दिव्यांग आर्ट गॅलरी व ढोने चित्रकला महाविद्यालयाच्या सहाय्याने हा उपक्रम राबवण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या आवारातील भिंतीवर कोरोना योद्ध्यांची चित्रे रेखाटली जात आहेत. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग आणि विविध सामाजिक संघटनांनी खांद्याला खांदा लावून आपली सेवा दिली. या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी पोलीस विभाग पुढे सरसावला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोलीस मुख्यालयाच्या आवारात भिंतीवर कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेली घोषवाक्ये, चित्रे, भित्तीचित्रे त्यासोबतच कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कार्याचे रेखाटने काढली आहेत. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमधून कोरोना काळातील संपूर्ण आलेख स्पष्ट दिसत आहे.
कोरोना महामारीची भीषणता, त्यासाठी लढणारे पोलीस, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचे श्रम आणि त्यांच्या सोबत धावणाऱया विविध सामाजिक संघटनांचा या माध्यमातून सन्मान करण्याचा हा एक प्रयत्न आहे. यासाठी पोलीस निरीक्षक गजानन शेळके, रोटरी क्लबचे पदाधिकारी, दिव्यांग गॅलरीचे प्रा. विशाल कोरडे, ढोने महाविद्यालयाचे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या निर्जीव भिंतीला सजीव करण्याचा प्रयत्न केला.