अकोला - महापालिकेकडून ब्रिटिश कालीन कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मंजूर करण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा निधी मुदत संपल्याने तसाच परत गेला. २०१६ साली मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून रस्ते, आवार भिंत, वॉटर गेम्सचे विकासात्मक कामे करण्यात येणार होती. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे यातील काही कामे अर्धवट झाली. तर काहीची मुदत संपल्यामुळे निधी परत गेला. यामुळे तलाव असूनही कुठल्याच कामासाठी उपयुक्त नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे तलावातील पाणी शेतकऱ्यांना ओलितासाठी द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
ब्रिटिश काळातील तलाव अशी कापशी तलावाची ओळख आहे. या तलावामुळे बाजूला वसलेल्या गावाला धोका निर्माण होऊ नये यासाठी कापशी गावाचे पुनर्वसन हे बाजूलाच करण्यात आले. या गावाला कापशी रोड असे संबोधले जाते. सद्यस्थितीत कापशी तलावात जवळपास ४० टक्के पाणी साठा आहे. ७५० हेक्टर जमिनीवर पसरलेले कापशी तलाव ब्रिटिश काळानंतर नगरपरिषद व आता अकोला महानगरपालिका यांच्या देखरेखीत आहे. या तलावाच्या परिसरात अंदाजे २ हजार हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांची आहे. मात्र, सद्यस्थितीत या कापशी तलावामधील पाण्याचा वापर केवळ मत्स्य उत्पादनासाठी होत आहे. याच कापशी तलावाच्या बाजूला अकोला महानगरपालिकेने निधी खर्च करून पर्यटन केंद्र उभारण्याचे ठरवले होते. परंतु, हे पर्यटन केंद्र फक्त कागदोपत्रीच ठरले.
एकेकाळी कापशी तलावामधून अकोला शहरास पाणीपुरवठा होत होता. त्यासाठी ब्रिटिश काळापासून मोठा वॉल तसेच विना विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या मशीन तलावामध्ये बसलेले आहेत. परंतु, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या मशीन सध्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत. या तलावामधील पाण्याचा वापर सद्यस्थितीमध्ये फक्त मत्स्य उत्पादनासाठी होत असून सिंचनासाठी कोणताही प्रकारचा वापर होत नाही. याबाबत मनपा अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
अशी होती कापशी तलाव सौंदर्यीकरणाची कामे -
कापशी तलाव - १३५० मीटर रस्ता खडीकरण बांधकाम, ४२ लाख ८५ हजार रुपयांची निविदा, मुदतीत काम न झाल्याने पैसे परत गेले. वॉटर गेम्स झाले नाही. या कामाचे पैसे परत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत गेले. डीपीडीसीमधून अंदाजित ७० ते ८० लाख निधी मंजूर झाला होता. परंतु, निविदा निघाली नाही. त्यामुळे पैसे परत गेले. तर आवार भिंतसाठी ५१ लाख २९ हजार रुपयांची निविदा काढून ३०० मिटरचे आवार भिंतीचे काम होणार होते.