अकोला - महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांना स्विकृत सदस्य म्हणून निवडून देण्यात आले. सत्ताधारी मोठा पक्ष आणि नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्विकृत सदस्यांचा दावा होता. ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, विजय जयपील्ले यांची निवड आज सभेत करण्यात आली.
भाजपाची अकोला महापालिकेत सत्ता आहे. त्यांचे संख्याबळदेखील सर्वात जास्त आहे. तीन स्विकृत सदस्य म्हणून निवडणे आवश्यक होते. सर्वच पक्षांचे संख्याबळ जास्त नव्हते. त्यामुळे ही संधी आपसूकच भाजपाला मिळाली. त्यामुळे भाजपाचे सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, विजय जयपील्ले यांनी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केले. त्यानुसार विशेष सभा बोलाविण्यात आली. या सभेत या तिन्ही पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर महापौर अर्चना मसणे, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती सतीश ढगे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक विजय अग्रवाल यांनी या नवनियुक्त नगरसेवकांचे स्वागत केले.