अकोला - महापालिकेतील अधिकाऱ्यांना कक्षामध्ये डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या महापालिकेतील विरोधी पक्ष नेता व नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी दोन तासानंतर काँग्रेसच्या जिल्हा मुख्यालय स्वराज्य भवन येथून आज ताब्यात घेतले. काँग्रेसचे मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी स्वराज्य भवनाच्या एका खोलीमध्ये स्वतःला व इतर पदाधिकाऱ्यांना बंद करून घेतले. त्यामुळे, सिटी कोतवाली पोलीस जवळपास दोन ते अडीच तास त्या खोलीबाहेर चकरा मारत होते. शेवटी पोलिसांनी साजिद खान पठाण यांना ताब्यात घेतले.
महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे सहाय्यक नगररचनाकार व उत्तर झोन अधिकारी यांना मनपाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या कक्षामध्ये आठ दिवस आधी जवळपास तीन तास डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने ही प्रभाग रचना करण्यात आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी या मनपाच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर लावला होता. त्यावर त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना मनपामध्ये जाब विचारला होता. मनपा आयुक्त कविता दिवेदी यांनी येऊन पोलिसांच्या मदतीने या दोघांना सोडविले होते.
या घटनेनंतर मनपा उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी या संदर्भामध्ये सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी 15 विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. या घटनेनंतर काँग्रेसचे मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकारी हे तेव्हापासून फरार होते.
दरम्यान, भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार होते. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी स्वराज्य भवन येथे येऊन साजिद खान पठाण यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, साजिद खान पठाण यांनी स्वराज्य भवन येथील एक कक्ष बंद करून पोलिसांना बाहेर ताटकळत ठेवले. जवळपास दोन ते अडीच तास पोलीस साजिद खान पठाण यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, ते दरवाजा उघडत नव्हते. शेवटी कालांतराने पोलिसांनी साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेसचे मनपातील गटनेते साजिद खान यांची उचलबांगडी
महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांना सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी स्वराज्य भवन येथून अटक केली. त्यापूर्वी काँग्रेसने त्यांची मनपातील गटनेतेपदावरून उचलबांगडी केली. त्यामुळे, आता त्यांच्याकडील विरोधी पक्ष नेतेपदही जाणार आहे. स्वराज्य भवनात बुधवारी झालेल्या बैठकीत नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांच्याकडे काँग्रेसने गटनेतेपद सोपविले. त्यासाठी काँग्रेसकडून लवकरच मनपा प्रशासन व महापौरांना रितसर पत्र दिले जाणार असल्याची माहिती आहे.
पदाधिकाऱ्यांनी मागितली पत्रकारांची माफी
मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांना सिटी कोतवाली पोलिसांनी अटक करून त्यांना काँग्रेसचे जिल्हा कार्यालय स्वराज्य भवन येथून बाहेर नेत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना कार्यालयात शूटिंग करू नये, यासाठी विरोध केला. तसेच, त्यांच्याशी अर्वाच्च भाषा वापरली. या प्रकारानंतर पत्रकारांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांची माफी मागितली. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील, प्रकाश तायडे, नगरसेवक पराग कांबळे, कपिल रावदेव यांच्यासह आदी उपस्थित होते.
साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन झालेला नाही. त्यासंदर्भात आम्ही आमच्या वकिलांना विचारणार, त्यानंतर निर्णय घेणार, अशी माहिती सीटी कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिली.