अकोला Akola Crime News : पतीसोबत सतत होत असलेल्या भांडणावरून आणि पती घटस्फोट देत नाही म्हणून एका क्रूर आईनं पाच वर्षांच्या मुलीचाच खून केल्याची घटना तब्बल दोन महिन्यांनी उघडकीस आली. पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून आईला अटक केली आहे. मुलीच्या नाकाला प्लास्टिकचा चिमटा लावून मुलीचा श्वास गुदमरून जीव गेला होता. पतीच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आईला अटक केली आहे. (Crime News)
कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी तगादा : याची गोष्ट अशी आहे की, बलोदे लेआउटमध्ये राहणारे रवी आमले (३६) यांच्या तक्रारीनुसार, त्यांना एक पाच वर्षाची मुलगी होती. त्यांची पत्नी विजया ही नेहमीच त्यांच्यासह आईसोबत वाद करायची आणि कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी तगादा लावायची. त्यामुळे ते २०१९ पासून हिंगणा येथे ते भाड्याने राहायला आले होते. २ जून राेजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी रवी आमले जेवायला घरी आले होते. त्यांची मुलगीही ट्युशनवरून घरी आली होती. त्यांनी तिच्यासोबत जेवण करून दोघांनीही दंगामस्ती केली होती. त्यानंतर रवी आमले हे कामासाठी बाहेर गेले होते.
मुलगी खेळता-खेळता झोपली : घटनेच्या दिवशी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पत्नीचा त्यांना फोन आला व पत्नीने त्यांना मुलगी ही पलंगावर खेळता-खेळता झोपली, पण ती आता उठत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे रवी आमले यांनी त्यांच्या मित्राला फोन करून घरी जाण्यास सांगितलं. ते घरी यायला निघाल्यावर पत्नी विजया व मित्र मुलगीला दुचाकीवर दवाखान्यात नेत असताना दिसले. त्यानंतर मुलीला दोन दवाखान्यांसह सर्वोपचार रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती मरण पावल्याचं सांगितलं.
पत्नी करत होती घटस्फोटाची मागणी : रवी आमले यांनी तक्रारीत म्हटलंय की, त्यांची पत्नी लग्नापासूनच वाद घालायची. घटस्फोटाची मागणी करायची. त्यांना हिणवायची. त्यामुळे पत्नीनेच मुलगी किशोरी हिच्या नाकाला प्लास्टीक चिमटा लावला. त्यामुळे किशोरी हिचा जीव गुदमरला आणि ती मरण पावल्याचा आरोप रवी आमले यांनी केला आहे. या प्रकरणात खदान पोलिसांनी मुलीच्या आईविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिकचा तपास ठाणेदार धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलिस कर्मचारी करंदीकर, आकाश राठोड करत आहेत.
पत्नीची चलाखी पकडली : मुलगी खेळत असताना, तिने नाकाला चिमटा लावला आणि ती झोपी गेली. त्यानंतर, तिला उठविण्याचा प्रयत्न केला असता, ती झोपून उठत नसल्याचे रवी आमले यांना सांगितले होते. तसंच तिने चिमटा लावल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा बनाव करून, पत्नीने तिला मारून टाकल्याचं रवी आमले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तेच तपासात समोर येत आहे.
वैद्यकीय अहवालावरून प्रकरण आले समोर : पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासला सुरुवात केली. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मुलीचे वडील रवी आमले यांना बोलावून त्यांनी तक्रार घेतली. त्या तक्रारीवरून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली.
हेही वाचा -
Morshi Murder Case: आई आणि भावाचा खून करून मुलगा झाला पसार; मोर्शी शहरात खळबळ
Palghar Crime : आईवर कुऱ्हाडीने वार करून अल्पवयीन मुलाकडून खून, तपासात सांगितले धक्कादायक कारण
Buldhana Crime: धक्कादायक! बाप लग्न करून देत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून