अकोला - 'कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील विविध भागात प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना, दर्शन आदींसाठी लोकांचे एकत्रीकरण टाळणे हे सर्वांच्या हिताचे असेल. त्यामुळे हे एकत्रीकरण टाळावे. तसे लोकांना आवाहन मंदिर ट्रस्टी, धर्मगुरु, मौलवी यांनी आपल्या स्तरावरून करावे,' असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सायंकाळी झालेल्या बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात शहरातील विविध मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च, जैन मंदिरांचे प्रमुख पुजारी, गुरु, ट्रस्टी, धर्मगुरु मौलवींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मशीद, चर्च, गुरुद्वारा, राज राजेश्वर मंदिर, राणी सतीदेवी मंदिर, तसेच शहरातील विविध मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.
'कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी लोकांचे कोणत्याही कारणाने होणारे एकत्रीकरण टाळणे हा उत्तम उपाय आहे. त्या दृष्टीने प्रार्थना, धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रार्थनास्थळांमध्ये नागरिकांचे बहुसंख्येने होणारे एकत्रीकरण टाळावे, या संदर्भात सर्व मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च वा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांनी निर्णय घेऊन लोकांना आवाहन करावे. त्याद्वारे आपण आपले शहर आणि शहरातील नागरिक सुरक्षित ठेवू शकू,' असा विश्वास जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला. या वेळी, धर्मगुरूंनी केलेल्या सूचनांवरही चर्चा करण्यात आली.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद
हेही वाचा - Coronavirus : माळढोक अभयारण्य पर्यटकांसाठी बंद, सोलापुरातील उद्यानेही 31 मार्चपर्यंत बंद