अकोला - हिवरखेड येथील वनी रंभापुर-अकोट-हिवरखेड-वरखेड या रस्त्याचे काम संथगतीने सुरू होते. अशात संचारबंदी लागू करण्यात आली आणि जिल्हा प्रशासनाने या रस्त्याच्या कामाची परवानगी नाकारली. यामुळे कंत्राटदारांनी सर्व मशिन्स जम्मू-काश्मिरच्या लेह येथे पाठवण्याची तयारी केली. ही बाब ग्रामस्थांना कळाली. तेव्हा ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला विनंती करुन काम सुरू करण्यासाठी परवानगी मिळवली. त्यामुळे रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. दरम्यान, या कामासाठी ५१ कोटींचा निधी मंजूर आहे.
वनी रंभापुर-अकोट-हिवरखेड-वरखेड या रस्त्याचे काम नविन अद्यावत मशिनींद्वारे करण्यात येत आहे. संचारबंदीमुळे हे काम बंद पडले, तेव्हा कंत्राटदारांने सर्व मशिने लेह लडाखला पाठवण्यासाठी तयारी केली. दोन मोठ्या ट्रेलरमध्ये मशिने चढवून रवानगीसाठी सज्ज होती. ही बाब गजानन दाभाडे यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी धीरज बजाज, राहुल गिर्हे, जितेश कारिया यांच्यासह अनिल कराळे, नीलेश महाजन, पंकज इंगळे यांना याची माहिती दिली. तेव्हा या सर्वांनी घटनास्थळी येऊन कंत्राटदाराचे प्रतिनिधी आणि चालकांना या संदर्भात विचारणा केली.
तेव्हा कंत्राटदारांच्या प्रतिनिधीने रस्त्याच्या कामाला परवानगी नसल्याने, मशीन लडाखला पाठवीत असल्याचे सांगितले. यावर धीरज बजाज, गजानन दाभाडे यांनी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सरनाईक, उपअभियंता बोचे यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी रस्त्याच्या कामास मंजुरी देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांची विनंती प्रशासनाने मान्य करत रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आणि या कामाला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, वनी रंभापुर ते वारखेड रस्त्याचे काम संथ गतीने सुरू होते. या रस्त्यासाठी हिवरखेड येथील रस्ताग्रस्त संघर्ष समितीने मोठे आंदोलन केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 30 मार्च पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन लेखी स्वरूपात आंदोलकांना दिला होते. परंतु, या रस्त्याचे काम कालावधी संपूनही, अद्याप हिवरखेडपर्यंत सुद्धा पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरील धूळीचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.
हेही वाचा - अकोला : जिल्ह्यात तेलंगाणातील मजुरांना घरी जाण्याची प्रतीक्षा, स्थानिकांकडून जेवणाची सोय
हेही वाचा - कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी क्वारंटाईन