अकोला - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलैड यांच्या न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल अवघ्या ८ महिन्यांमध्ये लागला. ही घटना जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. गजानन किसन अरदळे (वय, ४०) असे आरोपीचे नाव आहे.
जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एक १२ वर्षीय मुलगा २४ एप्रिल २०१८ ला दुपारी शौचालयासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहात गेला होता. आरोपी गजानन अरदळे हा तिथे उपस्थित होता. त्याने त्या मुलाला शरिरसुखाची मागणी करत ५०० रुपये देऊ केले. त्या मुलाने त्याला नकार दिला. यामुळे चिडलेल्या गजानन याने त्याच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. त्या मुलाने हा सर्व प्रकार घरी सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये कलम ३७७, ३२३ पोस्को ७, ८, ९, १०, ११, १२ नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
जुने शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड यांनी तपास पूर्ण करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले. आरोपीने जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने आरोपीला जामीन मंजूर करीत ४ महिन्यांच्या आत प्रकरण निकाली काढावेत, असे आदेश दिले. त्यानुसार हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे ८ व आरोपी पक्षातर्फे साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले. दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ मध्ये एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड पोस्को ७, ८ मध्ये ५ वर्षे व ५ हजार रुपये दंड, पोस्को कलम ९, १० मध्ये सात वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंड आणि पोस्को कलम ११, १२ मध्ये तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावला. सरकार पक्षातर्फे अॅड. मंगला पांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.