अकोला - अकोट तालुक्यातील पणज येथील शहापूर ब्रहुट प्रकल्प धरणात सोमवारी पोहायला गेलेला तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. शुभम अजाबराव फुकट (वय २५) असे या तरुणाचे नाव असून पाण्याचा अदांज न आल्यामुळे तो बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सतत पडणार पाऊस आणि वाढता पाण्याचा प्रवाह यामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. अशाच दोन घटना घडून एक आठवडा उलटत नाही तोच तिसऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शुभम सोमवारी आपल्या मित्रांसोबत अकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख रोडवरील शहापूर ब्रहुट प्रकल्प धरणात पोहायला गेला होता. येथे पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे तो बुडाला असल्याचे सांगण्यात आले. शुभमचे कपडे आणि जोडे काठावर ठेवलेले दिसत आहेत. सध्या गावातील नागरिकांकडून शोधकार्य सुरू असल्याची माहिती आहे. यावेळी परिसरातील जमाव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शहापूर ब्रहुट प्रकल्प धरणातील रेती माफीयांनी मोठ्या प्रमाणात खड्डे, भुयारे तयार करुन अवैध रेतीचे उत्खनन केले आहे. त्यामुळे धरणात जीवघेणे खड्डे तयार झाले असून पाण्याचा अदांज येत नाही. या धरणावर सुरक्षारक्षक नाही, तसेच कुठल्याच प्रकारच्या सूचना फलक देखील लावलेले नाहीत.
हा प्रकल्प उभारल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे परिसरालगतच्या गावातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.