अकोला - मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असणाऱ्या दोन व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन, त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे तब्बल 19 लाख 79 हजार 240 रु. ची रक्कम आढळून आली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.
दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडे या रक्कमेबद्दल चौकशी केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने, ही रक्कम सिव्हील लाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.आयकर विभागाच्या सूचनेनुसार आता पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बसवराज मलापा पल्लड आणि महंमद हमीद महंमद मेहबूब असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून, दोघेही कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
आयकर विभागाच्या अहवालानुसार पुढील कारवाई
ही रक्कम अकोला येथील व्यापारी आशीर्वाद ट्रेडर्स यांची असल्याची माहिती त्या दोघांनी दिली. ही रक्कम कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील उमर इंडस्ट्रीजचे संचालक यांच्याकडे पोहोचविण्यासाठी दिली होती, असे त्यांनी सांगितले. हे दोघेही रक्कम घेऊन कर्नाटककडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील उमर इंडस्ट्रीच्या संचालकांशी संपर्क साधला असता, या रकमेचे दस्तऐवज घेऊन ते अकोल्याकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा आणि सिव्हिल लाइन पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.