अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्प हा परतीच्या पावसामुळे शंभर टक्के भरला आहे. परिणामी आज(शुक्रवार) सकाळी 11 वाजता वान प्रकल्पामधून दोन दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडले आहेत. त्यामधून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा -पिंपरीत एक्स-रे मशीनच्या स्फोटात एक वर्षीय चिमुकली जखमी, डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
संपूर्ण प्रकल्पात मेळघाट तसेच अमरावती जिल्ह्यातील काही भागातून पाणी येत असल्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे. संपूर्ण पावसाळ्यात वान प्रकल्पाचे यावर्षी दहा ते बारा वेळा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वान प्रकल्पाच्या अखत्यारीत येत असलेल्या नदी काठच्या गावांना पुराच्या पाण्याचा धोका होऊ नये त्यामुळे आधीच सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
वान प्रकल्पाअंतर्गत एकूण सतरा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये वारी भैरवगड, वारखेड, सोगडा, दानापूर, बल्लारी, वडगाव, कोलद, काटोल, काकनवाडा खु., काकनवडा बु., रिंगण वाडा, दुर्गा दैनं, वानखेड ,खानापूर, पातुर्डा, पातुर्डा खु, देऊळगाव उजाड व आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा वेग पाहता आणखी पाण्याचा विसर्गामध्ये वाढ होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पाबाबत अधिक माहिती वान प्रकल्पचे अभियंता गुल्हाने यांनी दिली.