अहमदनगर - पोलीस आणि तरुणांच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिर्डीजवळील रूई गावात ही घटना घडली. सुदेश प्रभाकर भारती (४४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून पैसे घेतल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहले आहे.
सुदेशने कुटुंबीय बाहेरगावी गेले असल्याचे पाहून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर अधीक्षक रोहिदास पवार आणि शिर्डी उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली आहे़. आप्पासाहेब बाबूराव क्षिरसागर आणि अन्वर मन्सूर शेख या दोघांनी आपल्याला चोरीच्या गुन्ह्यात गोवले. तसेच एलसीबीने घरातून काही न सांगता नेले आणि शिर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी चव्हाण यांनी माझी पत्नी अन्नपुर्णाला ४० हजार रूपये दे, नाही तर तुझ्या नवऱ्याला तुरुगांत टाकीन, अशी धमकी दिल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. या नोटमध्ये त्यांनी माझ्यावर अन्याय झाला असून अपंगांसाठी कायदा काढला तो कुठे गेला? असा सवाल उपस्थित केला आहे.
नगरच्या गुन्हे अन्वेशन विभागाने त्याच्या कुटुंबाला काहीही माहिती न देता महिनाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास सुदेशला घरी जेवत असताना उचलून नेले. पोलिसांनी त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करण्याची तसेच जेलमध्ये पाठवण्याची धमकी देवून त्याच्या बायकोकडून पैसे उकळले. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. एका हाताने अपंग असलेला सुदेश रिक्षा चालक होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक अविवाहित मुलगी आणि लहान मुलगा असल्याचे सुदेशच्या सासू सुशिलाबाई गोसावी यांनी सांगितले. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सुदेशच्या घरच्यांची भेट घेऊन या घटनेतील पूर्वीचा दाखल गुन्हा, आत्महत्येचा पंचनामा, कुटुंबातील व्यक्तींचे, आरोपींचे तसेच संबंधित पोलिसांचे जबाब घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येणार येईल, असे आश्वासन सुदेशच्या कुटुंबीयांना दिले आहे.