अहमदनगर - सत्ता स्थापनेच्या खेळात मागील काही दिवसांपासून तणावात असलेले महाविकास आघाडीचे आमदार सत्तेचा मार्ग मोकळा होताच तणावमुक्त झाले आहेत. बुधवारी विधानभवनात झालेल्या आमदारांच्या शपथविधीनंतर याची प्रचिती आली. शपथ घेतल्यानंतर अनेक आमदारांनी एकत्र येऊन आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला.
अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार निवडून आले आहेत. यात युवा आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार हे सुद्धा आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह विधानभवनासमोर जमिनीवर बैठक मारत जल्लोष केला. कार्यकर्त्यांसोबत या आमदारांनी सेल्फीदेखील काढले.
हेही वाचा - श्वानासह पिंजऱ्यात कोंडून केले आंदोलन; श्वान जन्मदर नियंत्रण करण्याची मागणी
महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामे करण्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. महिनाभरापूर्वी अशी काही आघाडी अस्तित्वात येईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत येईल याची अजिबात शक्यता नव्हती. मात्र, आता सत्तेत आल्याने जनतेची कामे करताना अडचणी येणार नाहीत असेही लंके यांनी सांगितले.