अहमदनगर - 'बेटी बचाओ, बेटी पढाओ,' हा संदेश देतानाच, लग्न पत्रिकेत केवळ महिलांच्या नावाला प्राधान्य दिले, एवढेच नाही तर मंगल अष्टके आंतरपाट आणि मुलीच्या मागे मामा ऐवजी मामींना उभे केले. या सारख्या सोहळ्यातून त्यांनी महिलांना सन्मान मिळवून देण्याचा नवपरिवर्तनवादी पायंडा लोणी येथील म्हस्के परिवाराने पाडला आहे.
लग्न असले की लग्न पत्रिका आल्याच. पत्रिकेत कोणा-कोणाचे नाव टाकावे यासाठी सर्वांची धांदल उडते. त्यात एखाद्याचे नाव राहिले की रुसवे-फुगवे आलेच. त्याचबरोबर पत्रिकेतच्या सर्वात खाली चिमुकल्यांकडून आग्रहाचे निमंत्रण असतेच. पण, अलिकडे लग्न पत्रिकेतून विविध सामाजिक संदेशही देण्यात येत आहेत.
नगर जिल्ह्यातील शैक्षणिक हब असलेल्या लोणीतील प्रवरा कन्या प्रशालेतील कैलास म्हस्के या शिक्षकानेही आपल्या मुलीची लग्न पत्रिका छापली होती. मात्र, या पत्रिकेची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. कारण या पत्रिकेत निमंत्रक, स्वागतोच्छूक, प्रेषक, संयोजक, व्यवस्थापक, कार्यवाहक, अशी सर्वांची नावे महिलांचीच टाकली आहेत. प्रथम महिलेच्या नंतर पतीचे नाव टाकले आहे. एवढेच नाही तर लग्न कार्यात मंगल अष्टके, आंतरपाट आणि मुलीच्या मागेही स्त्रियांनाच उभे केले.
कैलास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने त्यांसह त्यांच्या भावंडांना वाढवले, चांगले शिक्षण दिले. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्या आईंविषयी खूप आदर व प्रेम आहे. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. मुलींनाही कैलास म्हस्के यांनी उच्चशिक्षित केले. शाळेतील विविध कार्यक्रामांतही ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश दितात. यावेळी ते स्वतःचेही उदाहण देत असतात. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न गुरूवारी (दि. 27 फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात पार पडले. लग्नातही या पत्रिकेची चर्चा सुरू होती.
हेही वाचा - छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमचे नगरसेवकपद रद्द