अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या मंदिरात आपल्या चिमुकल्या मुलीला सोडून जाणारी आई मुलीला परत घेऊन जाण्यास तयार झाली आहे. मुलीची आणि आईची आज डिएनए चाचणी करून मुलीला आईच्या ताब्यात दिले जाणार आहे.
कडोली तालुका एरंडोल (जिल्हा. जळगाव) येथील एका महिलेने प्रेम संबधातुन झालेल्या मुलीला प्रियकर आणि पती आपले नाव देण्यास तयार नसल्याने साई मंदिर परिसरात सोडले होते. 31 मे ला सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली होती. या घटनेनंतर साई संस्थानचे सुरक्षा रक्षक आणि शिर्डी पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला. मात्र, महिला मिळून न आल्याने या चिमुकल्या मुलीला अहमदनगर चाईल्ड लाईन संस्थेकडे सुपूर्त केले होते.
आपली मुलगी ठीक आहे का? हे पाहण्यासाठी 2 जूनला ही महिला शिर्डीच्या साईमंदिरात आली. त्यावेळी मुलीला परत घेऊन जाण्यास तयार नसल्याचे म्हणत होती. ही महिला गुरुवारी आपल्या मुलीला परत घेऊन जाण्यास तयार असल्याचे म्हणत आहे. माझ्या मुलीला प्रियकराचे नाव देणार यावर ती ठाम असून शिर्डी पोलिसांनी आपल्याला मुलगी परत द्यावी, अशी मागणी ती करत आहे.
शिर्डी पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही मुलगी याच महिलेची आहे का? याचा याचा तपास पोलीस करत आहेत. या मुलीची आणि आईची डिएनए चाचणी करुन हे सर्व प्रकारण राहाता न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशनंतर मुलीला आईकडे सुपुर्त केले जाणार असल्याचे शिर्डी पोलिसांनकडून सांगण्यात आले आहे.