अहमदनगर - शिर्डीमध्ये झालेल्या प्रतिक वाडेकर याच्या मृत्यू प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रतिक याचा मृत्यू त्याचे नातेवाईक टिकटॉकवर व्हिडिओ बनवत असताना, सनी पवार याच्या हातातील गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने झाला. पोलीस तपासात त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. शिर्डीतील हॉटेल पावन धाममधील रुम क्रमांक १०४ मध्ये ही घटना घडली होती.
नेमकी काय आहे घटना -
मृत प्रतिक वाडेकर, त्याचा चुलत भाऊ नितीन वाडेकर आणि त्याचे ५ मित्र यांनी 'फ्रेश' होण्यासाठी हॉटेल पावन धाममध्ये रुम भाड्याने घेतली होती. मृत प्रतिक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर शिर्डी) हा बाहेरगावी शिक्षणासाठी होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. रुम भाड्याने घेतल्यानंतर ५ जण रुममध्ये गेले. सनी पवार याच्याकडे गावठी कट्टा होता. तेव्हा त्याच्यातील एका मित्राने टिकटॉकवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अचानक सनीच्या हातातील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून प्रतिकच्या छातीत लागली. यात प्रतिकचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेनंतर चौघेही हॉटेलच्या रुम मधून फरार झाले. हॉटेल मालकाने रुममध्ये प्रतिकचा मृतदेह पाहून तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात भादंवि कलम ३०२, ३०७, प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हा प्रकार टिकटॉकवर व्हिडियो बनवण्याच्या नादात झाल्याचं निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शिर्डी सारख्या धार्मिक तीर्थस्थळी देशी कट्टे येतात कसे ? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत असून शिर्डीत गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे.