अहमदनगर - राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजने' अंतर्गत राज्यातील मागेल त्या गावांना शाश्वत वीज उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अहमदनगर येथे दिले. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात देवूळवाडी येथे 375 कोटी खर्चाच्या 400 केव्ही या उच्च क्षमतेच्या उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन आज गुरुवारी राज्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे-पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील बाभळेश्वरनंतर हे सर्वात मोठे उपकेंद्र असणार आहे. तसेच नगर, पुणे आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यातील अनेक भागांना येथून वीज वितरण होणार आहे.
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजने'ची माहिती देत सांगितले की, ही योजना राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये मागेल त्या गावांनी दहा एकर जागा उपलब्ध करुन दिल्यास शासनाच्या निधीतून त्याठिकाणी हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून दिला जाणार आहे. या माध्यमातून दिवसाला रोज आठ तास स्वस्तात वीज उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.