अहमदनगर- जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेले भंडारदरा धरण शनिवारी भरले. तांत्रिक दृष्ट्या धरणाची क्षमता अकरा हजार 60 दश लक्ष घन फूट आहे. मात्र, भंडारदरा धरणातून शनिवारी पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
धरणात पाणीसाठा 10500 दश लक्ष घन फूट झाल्याने धरणातून सद्या वीजनिर्मिती द्वारे 825 क्यूसेक, अंब्रेला फॉलद्वारे 300 क्यूसेक तसेच स्पिलवेद्वारे 2400 क्यूसेक असे एकूण 3500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सोडण्यात आला आहे.
भंडारदरा धरण मागच्या वर्षी 9 ऑगस्टला भरले होते. यावर्षी पाऊस उशिरा होऊनही धरण 3 ऑगस्टलाच भरले आहे. अवघ्या दोन महिन्यात हे धरण भरले आहे. 15 ऑगस्ट पुर्वी धरण भरण्याचे रेकॉर्ड या वेळीही कायम राहिले आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही. सद्यस्थितीत निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4500 दश लक्ष घन फूट आहे.
निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीतील हे पाणी जायकवाडी धरणाकडे आपला प्रवास सुरु करेल अशी माहिती किरण देशमुख यांनी दिली आहे.