शिर्डी - विधानसभा मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने सुरेश थोरात यांना मैदानात उतरवले आहे. ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आहेत. शिर्डी मतदारसंघात विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेससमोर उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर जोर्वे येथील रहिवासी आणि कट्टर काँग्रेस कार्यकर्ते सुरेश थोरात यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, थोरात हे नवखे उमेदवार आहेत.
हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...
शिर्डी मतदारसंघातून आमदार डॉ. सुधीर तांबे उमेदवार करतील अशी चर्चा होती. काँग्रेसनेही आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेश थोरात यांना उमेदवारी दिली आहे. विरोधकांना अर्थात काँग्रेसला विखेंच्या विरोधात तगडा उमेदवार देता आला नाही. सुरेश थोरात या नवख्या उमेदवाराला काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. मात्र, दुसरीकडे विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आता विखेंबरोबर आले आहेत. राहात्यातील राजेंद्र पिपाडा ही सध्या भाजपात असल्याने विखेंनी त्यांना आज उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि व्यासपीठावर घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा - युतीत 'बंड'खोरांची लाट; एकमेकांविरोधात उभे 'ठाक'
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेनेने साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली आहे. नवले हे उद्योजक असून त्यांनी आज संगमनेर प्रांत कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.