अहमदनगर - कोरोना विषाणूच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत ३० जून २०२० पर्यत वाढवावी, अशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यात कोरोना विषाणू संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र देऊन या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधून याबाबत तातडीने निर्णय करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत ही ३० मार्च २०२० पर्यंत होती. या कर्जमाफी योजनेत सरकारने जाहीर केलेल्या योजनेत सहभाग घेता यावा म्हणून शेतकऱ्यांची पूर्तता सुरू केली. परंतू, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मोठा अडथळा शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच उत्पादित केलेला माल बाजारात विक्रीसाठी आणणे शक्य होत नाही. बुधवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे, शेतकरी अधिकच अर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे, कर्जखात्यात भरावयाची रक्कम जमवणे अवघड असल्याबाबत विखे पाटील यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील सहभागासाठी आवश्यक असलेली पूर्तता शेतकऱ्यांना करता यावी. तसेच एकरकमी कर्जफेड योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा. तसेच, ज्या शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून आपल्या कर्जाचे पुनर्गठण करायचे आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांची तरतूद झाली नाही. तर, शेतकऱ्यांचे कर्जखाते थकबाकीत दिसतील, याच कारणाने शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहातील. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. म्हणून यासर्व कर्जमाफी योजनेस ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय करण्याची मागणी विखे पाटील यांनी कैली आहे.