अहमदनगर - नगर दक्षिणमध्ये मी भाजपचा उघड प्रचार केला. मला कशाची भीती? अशी उघड कबुली देत राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसविरोधात बंडाची हाक दिली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडले. आज विखे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.
शिर्डी मतदारसंघातील मतदान चौथ्या टप्प्यात होत आहे. येथील काँग्रेसचे उमेदवार कांबळे यांना विखे समर्थकांनी विरोध केला आहे. त्या पाठोपाठ जयंत ससाणे यांच्या समर्थकांनीही कांबळेंना विरोध केला. ससाणे समर्थक आणि विखे यांनी बुधवारी बैठक घेतली. यात विखे पाटलांनी काँग्रेसवर उघड निशाणा साधला.
काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधला गेला आहे. पक्षातील काही लोक तर मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पक्ष माझ्या मागे उभा राहिला नाही. त्यामुळे मी माझ्या मुलाच्या मागे उभा का राहू नये, असे विखे म्हणाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली. आपला फोटो काँग्रेसच्या बॅनरवरुन काढल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मला बाहेर काढण्यासाठी आणि नेता होण्यासाठी अनेक जण उतावीळ आहेत. पण, नेता व्हायला लोकांच्या मनात जागा निर्माण करावी लागते. अशी टीका त्यांनी थोरातांवर केली. आज ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जाते. राधाकृष्ण विखे आता उघड बंड करणार असल्याची प्रबळ शक्यता वर्तवण्यात येत आहे.